आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव बहाल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावे मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे असणार आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंतच्या काळापुरते मर्यादित असणार आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नव्हता कारण राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.
भविष्यात वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.