एनडीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावर काँग्रेसने ब्लॅक पेपर प्रकाशित केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युपीए सरकारच्या कार्यकाळावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हाईट पेपर आणण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने हा ब्लॅक पेपर जाहीर केला आहे.
भाजप खासदार आणि संसदीय वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा बुधवारी, 7 फेब्रुवारी रोजी म्हणाले होते की, सरकारचा व्हाइट पेपर 2014 पूर्वीच्या खराब अर्थव्यवस्थेचा उल्लेख असेल. तसेच 2014 नंतर पीएम मोदींनी आर्थिक परिस्थिती कशी बदलली हेदेखील सांगितले जाईल.यासंदर्भात खर्गे म्हणाले की, हा देशातील सर्वात मोठा मुद्दा आहे, जो भाजप सरकार कधीही उपस्थित करत नाही. दोन दिवसांपूर्वी ते पीएसयू बद्दल बोलले. नेहरू काळातील एचएएल, एचएमटी, भेल यांचा त्यांनी कधीही उल्लेख केला नाही. यामध्ये किती जणांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या हे कधीच सांगण्यात आले नाही. सरकार नरेगाचे पैसे देत नसल्याने गावांमध्ये रोजगार कमी होत आहे.
केरळ, कर्नाटक, तेलंगणा या गैरभाजपशासित राज्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही खर्गे यांनी यावेळी केला. वर्तमान सरकारच्या काळात एवढा पैसा जमा होतोय, असे मोदी म्हणतात, आधी का नव्हते, असे सांगून अप्रत्यक्षपणे त्रास आणि दबाव आणून निवडणुकीत पैसे गुंतवले जात असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. हा पैसा ते लोकशाही नष्ट करण्यासाठी वापरत आहेत. गेल्या 10 वर्षात भाजपने 411 आमदारांना आपल्या बाजूला घेतले. ते विकत घेण्यासाठी किती पैसे दिले हे मी सांगत नाही. मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड अशी आपली किती सरकारे निवडून आली हे तुम्हा लोकांना माहीत आहे. इथे सरकारे कशी पडली हे तुम्हाला माहीत आहे. आम्हाला धमकावून त्यांना कमकुवत करायचे असेल, तर काँग्रेसला किंवा मला त्याचा फटका बसणार नसल्याचे खर्गे यांनी सांगितले.