रोहित पवारांना अटकेला न घाबरण्याचा दिला सल्ला
पुणे, दि. ९ फेब्रुवारी – येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्या महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे यांनी केले. राज्यातील महाविकास आघाडी व केंद्रातील इंडि आघाडीच्या निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आज निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, रमा सरोदे, अश्विनी सातव ढोके यांच्यासह अनेक वादग्रस्त मंडळी मंचावर उपस्थित होती. आपल्या भाषणात या सर्वच नेत्यांनी एकमुखाने महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे नेते प्रशांत जगताप यांच्या, उबाठा शिवसेनेच्या व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाषण ऐकण्यासाठी गर्दी केली होती.
येत्या काळात देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आजवर आपण आपल्या आपल्यातच भांडत राहिलो. मात्र मोदी शहांना हारवायचे असेल तर आपण एकत्र आले पाहिजे असे वागळे यावेळी म्हणाले. इंडि आघाडीतून अनेक जण बाहेर पडत आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी एकसंध रहावे. मोदी व शहा यांच्या बलाढ्य सरकारशी लढण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र यायला हवे अशी कळकळीची विनंती वागळे यांनी व्यक्त केली. उपस्थित प्रेक्षकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे आमदार रोहित पवार यांना पाहताच त्यांनी अटकेला घाबरू नये असा सल्लाही वागळे यांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडीच्या विजयासाठी आजवर ५१ सभा आम्ही घेतल्या आहेत, आणखी अशाच अनेक सभा आम्ही घेणार असल्याचे यावेळी सर्व वक्त्यांनी सांगितले. पुण्यात आगामी काळात आणखी मोठी सभा घेण्याचे निर्देश वागळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नेते प्रशांत जगताप यांना मंचावरून दिले.
पुणे पोलिसांनी रक्षण करूनही पोलिसांवर अश्लाघ्य भाषेत आरोप
दरम्यान वागळे यांच्या या सभेपूर्वी त्यांच्यावर काही अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या व त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. पुणे पोलिसांच्या दक्षतेमुळे वागळे सुरक्षितरित्या सभास्थानी पोहोचू शकले. मात्र तरीही आपल्या भाषणात वागळे यांनी पोलिसांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पुण्याचे पोलिस विकले गेले आहेत असा गंभीर आरोप त्यांनी पोलिसांवर केला. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले.
पुण्यात येऊन पुणेकरांवरच घेतले तोंडसुख
पुण्यामध्ये गेल्या शंभर वर्षांपासून मारेकऱ्यांची परंपरा राहिली आहे अशी मुक्ताफळे वागळे यांनी आज सभेत उधळळी. १९४२ व त्याआधापासून पुण्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांवर हल्ले होत आले आहेत अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांचा अपमान केला. पुण्याचा इतिहास अतिशय देदिप्यमान असतानाही केवळ काही निवडक व्यक्तींमुळे पुण्याची अशी बदनामी वागळे यांनी केल्यामुळे पुणेकर नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे.