नागपूर, 11 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामकृष्ण विश्वनाथ बोंडाळे उपाख्य रामभाऊ यांचे आज, रविवारी सकाळी 10:15 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 99 वर्षांचे होते.
ज्येष्ठ प्रचारक असलेले रामभाऊ गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील महाल परिसरामध्ये संघ मुख्यालयात वास्तव्याला होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांच्या 5 पिढ्यांशी त्यांचा व्यक्तीगत परिचय होता. संघ मुख्यालयात येणारा प्रत्येक जण रामभाऊंना भेटल्याविना जात नसे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधल्या देवगड तालुक्यातील जामसंडे हे रामभाऊंचे मूळ गाव होते. याठिकाणी 22 एप्रिल 1925 रोजी रामभाऊंचा जन्म झाला होता. संघाची स्थापना सप्टेंबर 1925मध्ये झाली होती. त्यामुळे “रामभाऊ संघाहून 5 महिने मोठे आहेत” असे जुन्या पिढीतील स्वयंसेवक विनोदाने म्हणत असत.
रामभाऊ यांचे शालेय शिक्षण आधी अहमदनगरला व नंतर अंमळनेरला झाले. अंमळनेर येथूनच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर वर्धा येथील जीएस कॉलेजमधून रामभाऊ यांनी वाणिज्य शाखेतील पदवी (बी.कॉम. ) उत्तीर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1946 साली रामभाऊंनी संघचे पूर्णवेळ प्रचारक सेवाकार्य प्रारंभ केले. प्रचारक जीवनाचा अमृत महोत्सव पूर्ण करणारे रामभाऊ संघाशी संबंधीत अनेक घटनांचे साक्षीदार होते.
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाला रामभाऊंचा हस्ते संघ मुख्यालयात झेंडावंदन करण्यात आले होते. संघ समर्पित जीवन आणि राष्ट्रचिंतन या 2 तत्त्वांची जीवनभर ज्योत प्रज्ज्वलीत ठेवणाऱ्या रामभाऊंची प्राणज्योत आज, रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी मालवली. त्यांच्या पार्थीवावर संध्याकाळी 5 वाजता नागपुरातील गंगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.