सध्या राज्यात गोळीबार करण्याचे प्रकार, हल्ला करण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. वैयक्तिक वादातून बरेचसे हल्ले झाल्याचे गृह विभागाचे म्हणणे आहे. मात्र विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत तसेच इतर विरोधी नेते या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना दिसत आहे. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, अभिषेक घोसाळकर प्रकरण आणि पुण्यात निखिल वागळे आणि इतर लोकांवर जो हल्ला झाला तसेच राज्यात घडणारे इतर गुन्हे याबद्दल टीका करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. खासदार संजय राऊतांनी पुण्यातील हल्ला प्रकरणावरून सरकारवर , गृहमंत्र्यांववर टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना एक खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं? चार दिवसांपूर्वी पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्त त्यांनी एक शो केला. काही गुंडांची परेड केली. आता मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढणे वैगेरे बंद करा असे त्यांनी सांगितले. मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला, त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही. कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. त्यांनासुद्धा हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यांवरून फिरवा तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते.”
यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”कोण संजय राऊत? कोण आहेत? कोणी फार मोठे नेते आहेत? कोणी योग्य नेते असतील, त्यांच्याबद्दल मला विचारायचं, संजय राऊतांबद्दल काय विचारता? असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही कायदा सुव्यवस्था हातात न घेण्याचं आवाहन केले असून, दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.