राज्यसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. एकूण ५६ जागांसाठी ही नवडणूक होणार असून, महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या आधी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाने पुण्याच्या कोथरूडमधील माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान अशोक चव्हाण यांनी कालच भाजपात प्रवेश केला आहे. १५ तारखेचा पक्षप्रवेश कालच झाल्याने अशोक चव्हाणांना भाजपा राज्यसभेची उमेदवार जाहीर करतील अशी शक्यता होती. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये अशोक चव्हाणांचा समावेश आहे. अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे ही नांदेड नावे आहेत. त्यामुळे नांदेडला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय. मागच्या विधानसभेत तिकीट कापल्याने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या नाराज होत्या. मात्र आता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपा नेतृत्वाकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे.
अनेक नेत्यांचा पत्ता कट
राज्यसभेसाठी नारायण राणे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना देखील राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र यंदा भाजपाने या नेत्यांचा पत्ता कट केल्याचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. नारायण राणे व पियुष गोयल याना कदाचित लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.