लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा नातू विभाकर शास्त्री याने पक्षत्याग करत आज, बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे.
विभाकर शास्त्री यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ट्विटरवर सांगितले होते. काँग्रेसचे सदस्यत्व सोडल्यानंतर विभाकर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रृजेश पाठक यांच्या उपस्थितीत आज, बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचे नातू असलेले विभाकर शास्त्री यांचा राजीनामा काँग्रेसच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवार पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी मुरली देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जिशान यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना त्यांच्या पक्षाला घरघर लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.