आज दिवसभरात राज्यात देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेने महाराष्ट्र्र राज्यातील आपल्या राज्यसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. पुलवामा हल्ल्याला देखील आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच काही प्रमुख घडामोडी आपण जाणून घेऊयात.
भाजपा, शिवसेनेकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने आपल्या ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कालच पक्षात आलेले अशोक चव्हाण, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा पत्ता कट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरी घडामोड याच्याशीच संबंधित आहे. कारण शिवसेनेच्या वतीने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वाटत होती. मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने दक्षिण मुंबईत लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
१७,१८ फेब्रुवारीला भाजपाचे अधिवेशन होणार
दरम्यान, देशात लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. इंडिया आघाडी एनडीएला पराभूत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करणारा दिसत आहे. काही सर्व्हेनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून येणार असा अंदाज आहे. मात्र भाजपा लोकसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशातील सर्व खासदार आमदार आणि इतर विविध विभागांमधील प्रमुख नेत्यांना, प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करून कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्याची शक्यता आहे.
पुलवामा हल्ल्याला पाच वर्षे पूर्ण
१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा येथील हल्ल्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी ७८ वाहनांमधून प्रवास करणाऱ्या २५०० सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये भारतमातेची ४० वीर जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमधील जैश अ मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला होता. मात्र अवघ्या १२ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. बालाकोटमध्ये घुसून भारतीय सुरक्षा दलांनी एअरस्ट्राईक केला आणि शेकडो दहशतवाद्यांना ठार मारून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना ऋतं मराठीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो.
नारायण राणेंची मनोज जरांगे पाटलांवर टीका
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना अनेकजण उपोषण मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. राणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी एक ट्विट केले आहे. “मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली. त्यांनी आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखवा! तुम्हाला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत!”, अशी खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला सुचवली ‘ही’ तीन चिन्ह
अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. यामध्ये शऱद पवार गटाकडून पक्षाच्या नावासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदरावर पवार ही तीन नावे देण्यात आली होती. त्यामध्ये निवडणूक आयागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिले आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पक्षासाठी तीन चिन्हे सुचवली आहेत. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये शिट्टी, कपबशी आणि वडाचे झाड या नावांचा समावेश आहे.