पश्चिम बंगालमध्ये उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे हिंसाचार आणि लैंगिक छळाची घटना घडली. याबाबत आता भाजपाने संदेशखालीयेथील लैंगिक छळाच्या कथित घटनांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री आणि सहा खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची उच्चस्तरीय समितीच्या निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाने स्थापन केलेल्या समितीमध्ये प्रतिमा भौमिक, भाजप खासदार सुनीता दुग्गल, कविता पाटीदार, संगीता यादव आणि ब्रिजलाल यांचा समावेश आहे.
स्थापन करण्यात आलेल्या समितीला घटनास्थळी भेट देऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन पीडितांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यासंदर्भातील पूर्ण अहवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे. पी. नड्डा यांनी संदेशखाली येथील घटना ह्रदयद्रावक घटना असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांच्या छेडछाडीच्या आणि गुंडगिरीच्या घटना “पश्चिम बंगालमध्ये सातत्याने घडत आहेत.” कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. तरीही तेथील सरकार मूग गिळून गप्प बसून आहे असे नड्डा म्हणाले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पश्चिम बंगालच्या भाजपाच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.या यावेळी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसिरहाट उपविभागातील संदेशखाली भागात तणाव निर्माण झाला. संदेशखळी येथील महिला गेल्या काही दिवसांपासून टीएमसी नेते शजहान शेख आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर केलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मजुमदार जखमी झाल्या.
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने संदेशखालीसह सात ग्रामपंचायतीमध्ये अर्धा किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे त्या भागात भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. त्यादृष्टीने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंगालमधील संदेशखाली येथील घटनांवरून राजकीय वादळ उठल्याने मंगळवारी राज्याच्या आणखी एका भागात हिंसाचार उसळला.