इंडिया आघाडीला आता शेवटची घरघर लागली असल्याचे चित्र समोर आले आहे. या आघाडीतून होणारी गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. भाजप आणि मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी मोठ्या जोशात येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया आघाडी असा लोकसभा निवडणुकीत सामना होईल असे सांगितले जात होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच इंडिया आघाडीत पडलेले भगदाड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर उत्तर प्रदेशात जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान,अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी बंड पुकारत स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे पण त्याचबरोबर एनडीएसोबत युती करण्याचे संकेतही दिले आहे.
आता अब्दुल्ला यांच्या विधानाने खळबळ उडाली असून इंडिया आघाडीतून अब्दुल्ला बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. भविष्यात आम्ही एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेला आम्ही नाकारू शकत नाही. इंडिया आघाडीत जागा वाटपावरून चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधानांनी आम्हाला चर्चेस बोलवल्यास आम्ही जाऊ असा सूचक इशारा अब्दुल्ला यांनी यावेळी दिला आहे.
जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी तीन वेळा विराजमान झालेले फारुख अब्दुल्ला हे इंडी आघाडीचे प्रबळ समर्थक होते. मात्र आता त्यांनी अचानकपणे इंडी आघाडीतुन बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट केलेले नाही.
उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाने बाहेर पडत सरळसरळ एनडीएचा हात धरला आहे. तर समाजवादी पार्टीने काँग्रेसला फक्त ११ जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर इंडिया अलायन्स मध्ये आता नेमके कोण राहणार ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ लवकरच येणार आहे हे मात्र नक्की.