देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात देखील महायुती आणि मविआ मध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र यंदा सर्वांचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदार संघावर असणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्याने आता तिथे पवार घराणमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बारामती लोकसभेसाठी उमेदवार देणार असे दादांनी सांगितले होते. यामुळे बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभेची निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.
२०१९ नंतर भाजपाने देखील बारामती नक्की जिंकायची असा विश्वास व्यक्त केला होता. त्याप्रमाणे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बारामती दौरे सुरु होते. २४ मध्ये सुळेंना पराभूत करण्याचा चंगच भाजपने केला आहे. मात्र त्यावेळी तिथे त्यांना जास्त यश मिळणार नाही अशी चिन्हे होती. आता अजित पवारच भाजपाबरोबर सत्तेत गेल्याने भाजपासाठी बारामती जिंकण्याचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जात आहे. भाजपा देखील ही जागा अजित पवारांसाठी सोडेल असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर का सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली गेली तर महायुती त्यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करेल यात कोणतीही शन्का नाही. जर का सुनेत्रा पवार लोकसभेला उभ्या राहिल्या तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी यंदाची निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. कारण बारामतीमध्ये आतापासूनच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. बारामतीमध्ये रथाद्वारे, त्यावर एलईडी स्क्रीन लावून सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये चर्चाना उधाण आले आहे.