आज मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर केला आहे. दरम्यान २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सगेसोयरे याची अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन, उपोषण थांबवणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण येताना दिसत आहे.
राज्याच्या अनेक भागात मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी बस पेटवून दिल्याने याला हिंसक स्वरूप आले आहे. बसला लागलेली आग काही काळानंतर विझवण्यात आली आहे. ठिकठिकाणी टायर जाळून महामार्ग अडवले जात आहे. आंदोलन करून सरकारचा निषेध केला जात आहे. हिंगोलीमधील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारु कार्यालयासमोर देखील आता सकल मराठा समाजाने आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. त्यामुळे आरक्षणासाठी मराठा समाज हा पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे, कारण राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच सरकारकडून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल तयार करून राज्य सरकारकडे सोपवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. आता हा सर्वेक्षणाचा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय खास अधिवेशन बोलावले आहे. 20 फेब्रुवारीला हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही.