रायबरेली मतदारसंघातून पुढची निवडणूक न लढवण्याच्या सोनिया गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या पुढील संभाव्य उमेदवाराबाबत अटकळांना उधाण आले आहे. एकीकडे प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांना ही निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असे सांगितले जात आहे
काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाव्या पक्षाने यावेळी केरळमध्ये आपला उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस खासदार असणाऱ्या राहुल गांधींना वायनाडची जागा जिंकणे कठीण होऊ शकते. डाव्या पक्षाने तिथे उमेदवार उभा केल्यास उत्तर प्रदेशातली रायबरेलीची जागा राहुल गांधींसाठी जास्त सुरक्षित मानली जात आहे . अशा परिस्थितीत मात्र प्रियांका गांधी वढेरा यांच्याऐवजी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींचे वारसदार म्हणून केवळ राहुल गांधीच तिथे निवडणूक लढवतील असे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हा सोनिया गांधींच्या वारसांचा प्रश्न आहे. सोनिया गांधी यांनी सोडलेल्या जागेचे प्रतिनिधित्व फक्त त्यांचे वारसदारच करतील. हे नक्की असल्यामुळे सोनियांनी आपली जागा प्रियंका गांधी किंवा राहुल यांना देणार हे निश्चित आहे . या स्थितीत मात्र फक्त राहुल गांधीची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. कारण सोनिया गांधींनाही राहुलला पुढे न्यायचे आहे.
गांधी घराणे उत्तर प्रदेशशी असलेले संबंध पूर्णपणे तोडू शकत नाहीत हे निश्चित. दरम्यान सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांना भावनिक आवाहन करत पत्र लिहिले असल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत आपल्या कुटूंबाला निवडून देत कसे सांभाळून घेतले तसेच पुढेही घ्यावे असा काहीसा मायना या पत्रात आहे.
राहुल आणि प्रियांका यांच्यात एक ना एक जण येथून निवडणूक लढवणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात सर्वाधिक सक्रिय झाल्या आहेत, याचाही विचार काँग्रेस करत आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र असे असतानाही काँग्रेसच्या जागा आणि मतांची टक्केवारी घटली. त्यांच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात करिष्मा दिसला नाही.
उत्तरप्रदेशातली रायबरेली ही जागा काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा येथे फक्त तीन वेळा पराभव झाला आहे.