काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये निवडणूक पार पडली होती. अनेक घडामोडी घडल्यानंतर विजयी झालेल्या चंदीगडच्या महापौरांनी अखेर राजीनामा दिला आहे. चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे चंदीगडच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ बघायला मिळणार आहे. त्याच घडामोडींमध्ये अजून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपात सामील झाले आहेत. त्यावरून चंदीगडचे आपचे सनी सिंग अहलुवालिया यांनी भाजपावर आरोप केले आहेत.
चंदीगडचे आपचे सनी सिंग अहलुवालिया यांनी भाजपाने ऑपरेशन लोटस सुरू केले असा आरोप केला. केवळ तीन दिवसांपूर्वी लोकशाहीसाठी लढा देत त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना भाजपने धमकावले गेले. सध्या देशातही तेच सुरू आहे. दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरचरण काला या तीन आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिल्यानंतर चंदीगड भाजपाचे अध्यक्ष जतिंदर पाल मल्होत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”महापौरांनी रविवारी दुपारी राजीनामा दिला. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा प्रचार उघडपणे सुरू आहे. ते देशाच्या इतर भागात एकमेकांना शिव्या देत आहेत आणि ते चंदीगडमध्ये युती करत आहेत.” “काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसचा महापौर नको होता, त्यामुळेच त्यांनी क्रॉस व्होट केले… ‘आप’चा प्रचार थांबवण्यासाठी आम्ही राजीनामा दिला आहे… आप आणि काँग्रेसचे आणखी कार्यकर्ते आणि नगरसेवक लवकरच भाजपमध्ये सामील होतील.”