काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्याबाबतचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध धाव घेतली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. पुढील आदेश येईपर्यंत हेच नाव कायम ठेवावे असे महत्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच एका आठवड्यातसेच चिन्ह देखील देण्याचे आदेश कोर्टाने आयोगाला दिले आहेत. शरद पवार गट निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार हे माहिती असल्याने अजित पवार गटाने आधीच एक कॅव्हेट न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार आता कोर्टाने पुढील दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद केला. निवडणूक होईपर्यंत सध्या दिलेले चिन्ह आणि नाव हे कायम ठेवावे , आम्ही नाव आणि चिन्हशिवाय राहू शकत नाही असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. त्यावर न्यायालयाने देखील शरद पवार गटाला काही सवाल विचारले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणावर देखील निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले. तसेच अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी दिला.