संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. स्थानिक तृणमूल नेते शेख शेहजहान आणि त्याच्या साथीदारांकडून वर्षानुवर्षे महिलांचे होणारे शोषण आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने भारतीय जनता पक्ष आता राजधानी कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात आघाडी उघडण्याच्या तयारीत आहे.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेशखालीघटनेच्या निषेधार्थ कोलकात्यात सलग तीन दिवस निषेध कार्यक्रम आयोजित करण्याची योजनाही पक्षाने आखली आहे. कोलकाता येथील गांधी पुतळ्याखाली पुढील मंगळवार 27 फेब्रुवारीपासून गुरुवार 29 फेब्रुवारीपर्यंत सलग तीन दिवस हे धरणे सुरू राहणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत,
सुकांत मजुमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 मार्च रोजी बारासात येथील कोर्ट मैदानावर सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. संदेशखालीतील पीडितांची भेट मोदी घेतील असे सांगण्यात येत आहे. याआधी 29 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यात येणार होते. त्या दिवशी त्यांना नादियातील मायापूर येथील इस्कॉन मंदिरात जायचे होते. यानंतर ते राणाघाट आणि नजीकच्या लोकसभेच्या भाजप नेतृत्वासोबत बैठक घेणार होते. मात्र, तो दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, राजधानी कोलकातामध्ये भाजप पक्षाचे आंदोलन ममता बॅनर्जी राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.