आज अर्थसंकल्पीय अधिवेशधानाचा दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र अधिवेशनाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून झाली. आशिष शेलार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत यावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत आपले म्हणणे मांडले आहे.
विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”आपण मराठा समाजाला टिकणारे,कायद्याच्या चौकटीत बसणारे, ओबीसी व इतर समाजावर अन्याय न करता टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणे आपण मराठा आरक्षण दिले. गेली अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता. त्यासाठी ५६ मोर्चे झाले. अत्यंत शांततेत मोर्चे झाले. मराठा समाज सयंमी आहे, शिस्तीने वागणारा आहे. सरसकट प्रमाणपत्रे देता येणार नाही हे, मी स्पष्ट केले होते. सरसकट नंतर सगेसोयरे विषय समोर आला. त्यांच्या मागण्या एकामागोमाग बदलत गेल्या. मी जे बोलतो ते करून दाखवतो. खोटे आश्वासन मी देत नाही.”
एसआयटी चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले आहेत.आजपासून (27 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी जरांगेंच्या चौकशीबाबत मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. जरांगेंच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. तर हीच मागणी प्रवीण दरेकर यानी विधानपरिषदेत केली आहे.