नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर भाजपने बाजी मारली आहे. आता या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी १५ भाजपा आमदारांचे निलंबन केले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये विधानभवनात भाजपाचे आमदार सतत गोंधळ घालत होते. त्यामुळे कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत होते. यासाठी १५ भाजपा आमदारांना निलंबित केल्याचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितले. कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितले.
सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १५ आमदारांमध्ये जय राम ठाकूर, विपिन परमार, रणधीर शर्मा, हंस राज, विनोद कुमार, जनक राज, बलबीर वर्मा, लोकिंदर कुमार, त्रिलोक जामवाल, सुरिंदर शौरी, पूरन चंद, दलीप ठाकूर, इंदर सिंगब,गांधी, रणबीर निक्का आणि दीप राज यांचा समावेश आहे. राज्याचे संसदीय पक्ष कार्यमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याची शिफारस करणारा प्रस्ताव मांडल्यानंतर सभापतींनी भाजप आमदारांना निलंबित केले.
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश मधल्या काँग्रेस पक्षामध्ये कलह सुरु असल्याचा बातम्या समोर येत होत्या. गेल्याचा महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या अध्यक्षतेखाली हिमाचल मंत्रिमंडळाची बैठक झाली असता विक्रमादित्य सिंह यांच्यासह इतर दोन मंत्र्यांकडून त्यांचे विभाग कडून घेण्यात आले होते. यावेळी मंत्रिमंडळातून तीनही मंत्री एकाचवेळी गायब झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.