एप्रिल ते मे महिन्यात देशभरात लोकसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. यामध्ये भाजपाला ३७० तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे भाजपचे नेते सांगत आहेत. तर ‘इंडी’ आघाडी स्थापन करून देशातील सर्व विरोधक देशात पुन्हा मोदी सरकार जिकून येऊ नये म्हणून तयारी करताना दिसत आहे. दरम्यान लोकसभेसाठी भाजपाने राज्यात ‘महाविजय’ अंतर्गत ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. जे मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
राज्यात महायुतीचे जागावाटप अजून निश्चित झालेले नाही. मात्र प्रत्येक पक्ष काही जागांवर आपलाच दावा सांगताना दिसून येत आहे. सध्या चर्चा आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची. राज्यसभेच्या निवडुकीत भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र या जागेवर शिवसेनेने आपला दावा केला आहे. रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघ शिवसेनाच लढणार असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे ही जागा राणेंना सोडण्यास शिवसेना तयार नसल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नारायण राणे, निलेश राणे किंवा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या जागेचा तिढा वाढत चालेल पाहायला मिळत आहे. मात्र एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे दोन्ही बाजूंचे म्हणणे असल्याचे दिसून येतंय. त्यामुळे येथे कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.