देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच भाजपात उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेचा महासंग्राम या tv ९ च्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी मोदींची गॅरंटी, विकास, मराठा आरक्षण, शरद पवार, राज्यात लोकसभेला किती जागा जिंकणार यावर भाष्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसेच त्यांना बामणी कावा असे म्हणून देखील त्यांच्यावर टीका केली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील याची काही दिवसांनी सांगितले की, मी खूप दिवस उपाशी होतो. त्यामुळे माझा ताबा सुटला होता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यावर मी तुम्हाला एक सांगतो. मनोज जरांगे पाटील हे तर बिचारे नवीन आहेत. मात्र ज्यावेळी काही सापडत नाही विषय, तेव्हा पवार साहेबांसारखा माणूस देखील जातीवर जातो. ज्यावेळी आम्ही संभाजीराजेंना तिकीट दिले, तेव्हा पवार साहेब नाराज झाले होते. पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमतात असे विधान त्यांनी केले. माझ्याविरुद्ध कोणताही विषय मिळत नाही, त्यांना माझ्यावर कसलेही आरोप लावता येत नाहीत. त्यावेळेस जातीचा आरोप लावण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र खूप पुढे गेला आहे, हे त्यांना समजत नाही. महाराष्ट्र जातीपातीत अडकणार नाही.”
काय म्हणाले होते जरांगे पाटील?
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यात त्यांनी मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा डाव आहे. तसेच जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आरोप करताना बामणी कावा असे देखील म्हटले होते. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपा नेते आणि राज्यातील इतर नेते जरांगे यांच्यावर टीका करू लागले. तसेच सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.