आज बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत आज हा भव्य मेळावा पार पडला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ३४७ आस्थापनामार्फत ५५ हजार ७२ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली होती. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना अजित पवारांनी बारामतीच्या विकासाबाबत भाष्य केले आहे.
नमो महारोजगार मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, ”मी फुशारकी मारत नाही. पण बारामतीमध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतींना मी चाळीस- चाळीस वेळा भेटी दिल्या आहेत. राज्यातील विकासकामे मी मनापासून करत असतो. बारामती तालुका हा राज्यातील सर्वात विकसित आणि १ नंबरचा तालुका करायचा आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, पाठिंबा हवा आहे. बारामती तालुका एक नंबरचा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील नेते साथ देतील.”
अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेचा सामना रंगण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्यास त्यांना भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची मदत होणार आहे. महाराष्टातील लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्यास यंदाची बारामतीची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.