पुणे, 3 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहे.यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भावी खासदार सुनेत्रा पवार अशा आशयाचे फ्लेक्स खडकवासला मतदारसंघात लागल्याचे पाहण्यास मिळत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की,मागील १५ वर्षापासून त्यांच्यासोबत (सुप्रिया सुळे) मतदार संघात काम केले आहे.तर आता आम्ही १५ वर्षानंतर जनतेचा कौल पाहत असून विकास कामांच्या बाजूने कौल देणारी जनता आहे.