देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नेत्यांचे राज्यतील दौरे वाढले आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. आता अमित शहा देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा सभेला संबोधित करणार आहेत.
अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या महिन्यात लोकसभेच्या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. तारखा जाहीर झाल्यास याच महिन्यात आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. ‘इंडी’ आघाडी देखील या निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावणार असे चित्र दिसते. दरम्यान लोकसभेसाठी सर्वात जास्त या जागा उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. या निमित्ताने केंद्रातील नेत्यांचे राज्यातील दौरे देखील वाढले आहेत.
महायुतीने ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणूका जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील ६ लोकसभा मतदार संघाचा आढावा अमित शहा घेणार आहेत. यासाठी ते पधाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सभेला ते संबोधित करणार आहेत. तसेच लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात राज्यातील महत्वाचे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच अमित शहा हे आपल्या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.