पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील आदिलाबाद येथे 56,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित केले. ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडी’ आघाडीवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील आदिलाबाद येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार, परिवारवाद यावरून ‘इंडी’ आघाडीवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”देशातील १४० कोटी लोक हे माझे कुटुंब आहे आणि माझे जीवन एक खुले पुस्तक आहे. “भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडलेले ‘इंडी’ आघाडीचे नेते चिंताग्रस्त होत आहेत. मी त्यांच्या ‘परिवार’वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा ते मोदींना कुटुंब नाही असे म्हणून लागले.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ” देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे. आज देशातील करोडो मुली, माता आणि बहिणी हे मोदींचे कुटुंब आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती हे माझे कुटुंब आहे. ज्यांचे कोणीही नाही, ते सुद्धा मोदींचे आहेत आणि मोदी त्यांचे आहेत. ते म्हणतात ‘नेने मोदी कुटुंबम’ (मी मोदी परिवार आहे).”
“देशवासी मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि समजून घेतात, माझ्या प्रत्येक क्षणाचा हिशेब ठेवतात. कधी कधी मी रात्री उशिरापर्यंत काम करतो आणि बातम्या येतात, तेव्हा देशभरातून लाखो लोक मला पत्र लिहितात की मला इतके काम करू नका, काही काळ विश्रांती घ्या”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवण्याची ग्वाही पंतप्रधानांनी या सभेत दिली.
“मेरा भारत, मेरा परिवार या भावनांनी मी जगतो. मी तुमच्यासाठी जगत आहे, तुमच्यासाठी लढत आहे आणि तुमच्यासाठी लढत राहीन, तुमची स्वप्ने निर्धाराने पूर्ण करेन.” केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेल्या विकासाच्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. “आज आदिलाबादची भूमी केवळ तेलंगणासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासाच्या अनेक ट्रेंडची साक्षीदार आहे. आज मला येथील 30 हून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. 56 हजार कोटींहून अधिक किमतीचे हे प्रकल्प आहेत. तसेच आम्ही तेलंगणासह देशातील अनेक राज्यांमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहू”, असे पंतप्रधानांनी या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.