‘इंडी’ आघाडीतील राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी आपल्या भाषणात भाजपावर परिवारवादावरून टीका केली होती. यावेळी लालू प्रसाद यादव यांनी मोदींच्या कुटुंबावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भाजपा नेत्यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरील आपला बायो बदलला आहे. भाजपाच्या बऱ्याचशा नेत्यांनी आपल्या बायोमध्ये ‘मोदी का परिवार’ असे लिहिले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एक्सवरील आपला बायो बदलला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी मोदींच्या समर्थनार्थ आपला बायो बदलल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपने बायो बदलून रणनीती आणि प्रचार सुरु केल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका सभेत ‘मे हू मोदी का परिवार’ असा नारा दिला होता. त्यानंतर अनेक दिग्गज भाजप नेत्यांनी एक्सवरील आपला बायो बदलला आहे. सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांकडून याचे अनुकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘इंडी’ आघाडीतील घटक असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर परिवारवादावरून टीका केली होती. लालू प्रसाद यादव यांनी मोदींच्या कुटुंबावर सवाल उपस्थित केले होते. मोदींना कुटुंब नाही त्याला आम्ही काय करू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर केशवपन केले नव्हते , यामुळे ते हिंदू नाहीत अशी जहरी टीका लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ भाजपा नेते मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.