काल राज्याची उपराजधानी नागपूर येथे नमो युवा महासंमेलन पार पडले. या संमेलनामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, तेजस्वी सूर्या , देवेंद्र फडणवीस आणि आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी युवांना संबोधित राहुल गांधी, २०१४ पर्यंत केंद्रात असणाऱ्या युपीए सरकारवर टीका केली आहे. तसेच एनडीए आणि युपीए सरकारमधील १० वर्षांमधील कामगिरीबद्दल चर्चा करण्यासाठीचे आव्हान दिले. जागा राहुल गांधी यांनी ठरवावी , भाजपा या चर्चेसाठी आपला एक कार्यकर्ता निवडेल.
नागपूरमध्ये ‘नमो युवा महासंमेलन’ या कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना चर्चेसाठी आमंत्रित केले. त्या म्हणाल्या, ”जर का माझा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी आपले कान उघडून ऐकावे. १० वर्षे कोणाची चांगली होती यावर चर्चा होऊद्या. जागा तुम्ही निवडा आम्ही आमचा कार्यकर्ता निवडू.” राहुल गांधी यांच्यासमोर युवा मोर्चाचा कार्यकर्ता बोलू लागला तर ते बोलण्याची ताकद गमावतील, असे त्या म्हणाल्या.
एनडीए सरकारने गरीब समाजासाठी बँक अकाउंट, घरांमध्ये शोचालये, ८० कोटी लोकांना मोफत रेशन आणि महिना ३३ टक्के आरक्षण असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. युवा मोर्चाचा कोणताही कार्यकर्ता राहुल गांधींचा पराभव करण्यास सक्षम असल्याचेही स्मृती इराणी म्हणाल्या. काँग्रेस खासदारावर निशाणा साधत केंद्रीय मंत्री म्हणाल्या, “जेव्हा रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा राहुल गांधींना निमंत्रित केले होते, पण ते आले नाहीत. अहंकार अजूनही कायम आहे आणि अहंकार दूर झालेला नाही. “