केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नेत्यांचे राज्यतील दौरे वाढले आहेत. दरम्यान आज जळगाव येथे युवा शक्ती संगम कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी यांच्यावर परिवारवादावरून जोरदार टीका केली आहे. तसेच कलम ३७० वरून राहुल गांधींना देखील टोला लगावला आहे.
जळगाव येथील युवा शक्ती संगम कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासमोर महान भारताचे, विकसित भारताचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या १० वर्षांत मोदीजींनी भारताला सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. काँग्रेस आणि युपीएचे सरकार असताना सतत देशावर हल्ले होत असत, बॉम्बस्फोट होत असत. पण आपल्याकडून काहीच उत्तर मिळायचं नाही. मात्र मोदीजी आले उरी आणि पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहा दिवसांच्या आतमध्येच पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांना ठार मारले. ७० वर्षांपासून काँग्रेसने आर्टिकल ३७० बाबत काहीच ठोस भूमिका घेतली नाही. कलम ३७० हटविल्यास असे होईल नी तसे होईल असे सांगितले जायचे. तुम्ही नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनवले आणि मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द केले. संसदेत राहुल गांधी मला म्हणायचे कलम ३७० हटवू नका नाहीतर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. अरे राहुल गांधी कलम ३७० हटवून पाच वर्षे झाली रक्ताचे पाट सोडाच साधी दगड हातात घेण्याची कोणाची हिंमत नाही झाली. नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित करण्याचे काम केले आहे.”
महायुतीने ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणूका जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील ६ लोकसभा मतदार संघाचा आढावा अमित शहा घेणार आहेत. यासाठी ते पधाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. आणिछत्रपती संभाजीनगर येथे सभेला ते संबोधित करणार आहेत. तसेच लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात राज्यातील महत्वाचे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच अमित शहा हे आपल्या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.