देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. लवकरच यासंदर्भात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी ‘इंडी’ आघाडीवर टीका केली आहे. केंद्रीय राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ”इंडी आघाडी ही भ्रष्ट लोकांची, घोटाळेबाजांची आणि गरिबांचे हक्क हिसकावून घेणाऱ्यांची आघाडी आहे. जी घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या धोरणांवर विश्वास ठेवणारी आहे.”
एएनआयशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, ”सत्तेसाठी एवढा संघर्ष आहे, ज्यांचे कोणतेही धोरण नाही. त्यांना लोकांची आणि त्यांच्या विकासाची पर्वा नाही. जिथे स्वार्थ असेल तिथे संघर्ष होईल.” आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए बिहारमध्ये ४० पैकी ४० जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी व्यक्त केला.
४ मार्च रोजी लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नाही असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर सर्व भाजपा नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर मोदी का परिवार असे बदल केले आहेत. तसेच आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हा मुद्दा आपल्या सभांमध्ये उचलून धरत आहेत. देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लालू प्रसाद यादव यांच्या वक्तवयाचा नित्यानंद राय यांनी समाचार घेतला आहे. बिहारमध्ये जनादेश गमावल्यामुळे लालू प्रसाद यादव अशी वक्तव्ये करत असून त्यांची वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असे नित्यानंद राय म्हणाले.