देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचारात उडी घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्कम बहुमत मिळविण्यासाठी भव्य दौरा सुरू केला आहे आज ते तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदींच्या आजच्या कार्यक्रमाचा तपशील भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांच्या X हँडलवर शेअर केला आहे.
भाजपच्या एक्स हँडल पोस्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जगतियाल येथे सकाळी 11:30 वाजता एका जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर ते कर्नाटकात जाऊन दुपारी 3.15 वाजता शिवमोग्गा येथील सभेला संबोधित करतील. संध्याकाळी ते तामिळनाडूला पोहोचतील आणि 5:45 वाजता कोईम्बतूरमध्ये रोड शोमध्ये सहभागी होतील.
14 मार्च रोजी कोईम्बतूर भाजपचे जिल्हाध्यक्ष जे. रमेश कुमार यांनी रोड शोसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. 15 मार्च रोजी सकाळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि परीक्षा आयोजित केल्याचे कारण देत परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर जे. रमेश कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना काही अटींसह पंतप्रधान मोदींच्या रोड शोला मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. .