सध्या राजकारणात काही वेळात मोठी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. राज ठाकरे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मात्र त्या आधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता असून, मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहेत. असे झाल्यास राज्यात महायुतीला लोकसभा आणि विधानसभेला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि पक्ष हिताचा असेल असे मत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
मनसे संदीप देशपांडे म्हणाले, ”राज ठाकरे दिल्लीत का गेले आहेत ते काही तासांमध्ये स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राच्या, पक्षाच्या हिताचा असेल.” तसेच बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेले तर, आम्हाला आनंदच आहे, असे देशपांडे म्हणाले. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.
मनसे जर का महायुतीमध्ये सामील झाल्यास राज्यात महायुतीला लोकसभा आणि विधानसभेला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीत सामील झाल्यास बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळू शकते. ठाकरे गटाकडून याआधीच अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास जागावाटप कशाप्रकारे होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.