मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले आहे. त्यानंतर राज्य सरकारने विधानसभेत कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र जरांगे पाटील हे सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील हे परळी वैद्यनाथ येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बैठकीचे आयोजन करणाऱ्या संयोजकांनी मुंबई उच्च नयायल्याच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून, याचिका दाखल करण्यात आली आहे.
गेले काही दिवस मनोज जरांगे पाटील हे अनेक जिल्ह्यांमध्ये फिरून समाजातील लोकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, आज सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैद्यनाथ या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीची समाजाला माहिती होण्यासाठी ऑटो रिक्षावर ध्वनिक्षेपक वाजवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या अर्जावर काही अटी-शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, धर्म, भाषा जात या मुद्द्यांवर एकत्रित येऊ नका असे आदेश काढण्यात आले. त्यामुळे आता या आदेशा/नोटिशीविरुद्ध संयोजकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांच्या अडचणी वाढत दिसून येत आहेत. बीड जिल्ह्यामध्येच जरांगे पाटील यांच्यावर एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या जेसीबींवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, पुढील दिशा ठरविण्यासाठी जरांगे पाटील यांनी २४ तारखेला महत्वाची बैठक अंतरवली सराटीमध्ये बोलावली आहे. दरम्यान, या बैठकीला पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.