केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच आचारसंहिता देखील लागू केली आहे. एकूण ७ टप्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान भाजपाने काल आपली चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी देखील आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाहीये. काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान आज दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
आजच्या भाजपचा केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मध्यंतरी महायतिचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी गेले आहेत. मात्र दोन दिवस त्यांची आणि शहांची भेट होऊ शकली नाहीये. साताऱ्यातून उदयनराजे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा , फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील निर्णायक बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच मनसे सोबत आल्यास त्यांना किती जागा द्यायच्या व कोणत्या द्यायच्या याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. तोडगा झाल्यास आणि जागावाटप झाल्यास संध्याकाळी किंवा रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.