लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपाने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात देखील भाजपाने २५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. चंद्रपूर मधून विद्यमान आमदार आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुधीर मुनगंटीवार लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला आहे. भाजपाने मिशन ४५ प्लसची सुरुवात चंद्रपूरमधून केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. तुम्ही डोळ्यांतील अश्रू पाहून, वैयक्तिक सहानुभूतीवर मतदान कराल तर पुढील पाच वर्षे डोळ्यात पाणी येईल असे म्हणत मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना टोला लगावला आहे. घाई घाई मी मंचावर आलो आहे, कोणाचे नास घ्यायचे राहिले असल्यास माफ करा. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलोय, मात्र ज्यांच्या नावामध्येच देव आहे असे देवेंद्र फडणवीस आज आशीर्वाद द्यायला आले आहेत.
दरम्यान अब की बार ४०० पार, पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा आपल्याला भारताचे पंतप्रधान करायचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुधीरभाऊंचा आवाज मुंबईत महाराष्ट्रात घुमत होता आता तीच तोफ दिल्लीत धडाडेल. सुधीर मुनगंटीवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मतदारांना संबोधित केले आणि मुनगंटीवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.