लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक देखील होणार आहे. मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी घोषित केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू हे बिनविरोध विजयी झाले आहेत. राज्यात निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच भाजपला मोठा फायदा झाला आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे आणखी उमेदवार बिनविरोध विजयी होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीसोबतच १९ एप्रिलला अरुणाचलमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण ६० आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत.
अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध विजयी घोषित होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत भाजपचे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, ज्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार नाही. यामुळे एनडीएला अरुणाचल प्रदेशमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी चांगले वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच देशभरात देखील लोकांचा कल हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकडे असलेला काही सर्व्हेंमधून पुढे आला आहे.
देशभरात आतापर्यंत भाजपाने आपल्या ७ याद्यांच्या माध्यमातून लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. एनडीए सरकारने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. काँग्रेसने ७० वर्षांत केलेली कामे आणि भाजपा सरकारने १० वर्षात केलेली कामे याचा हिशेब यांच्या प्रचारसभांमधून जनतेसमोर मांडला जाणार आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान अजून काही जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे.