देशात लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. आधी वंचित बहुजन आघाडी मविआ सोबत जाईल अशा प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. मात्र चर्चा फिस्कटल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकरांनी आपले अनेक उमेदवार राज्यात जाहीर केले आहेत तर, काही ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
मविआ सोबत चर्चा बिघडली असली तरीही वंचित बहुजन आघाडी सध्या मविआ सोबत मैत्रीपूर्ण पावले उचलत असल्याचे पाहायला मिळतंय. आता पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याने आता पुण्यात मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. तसेच बारामतीमध्ये यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सिप्रिय सुळे अशा लढतीत प्रकाश आंबेडकरांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि मंगलदास बांदल यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.