काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनियांचे अभिनंदन करून राज्यसभा सदस्य म्हणून नवीन इनिंग सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.खर्गे यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे कि, “त्यांची धैर्यशील वृत्ती आणि कृपादृष्टी आमच्या संसदीय रणनीतीला मार्गदर्शन करत राहील. त्यांनी लोकसभेत 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आता आम्ही वरच्या सभागृहात त्यांच्या उपस्थितीची वाट पाहत आहोत. मी त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”
सोनिया गांधी यांच्या शपथविधीप्रसंगी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा आणि रॉबर्ट वाड्रा हेही उपस्थित होते.
77 वर्षीय सोनिया गांधी यांची राज्यसभा सदस्य म्हणून ही पहिलीच टर्म आहे. सोनिया रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्या आता लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.1999 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर राज्यसभेत प्रवेश करणाऱ्या सोनिया गांधी या गांधी कुटुंबातील दुसऱ्या सदस्या आहेत. इंदिरा गांधी ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967 या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या.