केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान देशभरात भाजपा म्हणजेच एनडीए आणि इंडी आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मागच्या व्हिडिओत आपण सोलापूर लोकसभा मतदार संघातील जाहीर झालेले उमेदवार, तेथील जनतेचे प्रश्न, राजकीय बलाबल आणि जातीय समीकरणे याबाबत जाणून घेतले.आजच्या व्हिडिओत आपण नागपूर लोकसभा मतदार संघाविषयी जाणून घेणार आहोत.
आज आपण नागपूर लोकसभेबद्दल जाणून घेणार आहोत. नागपूरबद्दल काय बोलायचं मित्रांनो. राज्याची उपराजधानी असलेले नागपूर म्हणजे २०१४ पासून भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. नागपूर म्हंटले की आठवतात ती तेथील संत्री, दीक्षाभूमी आणि अन्य ठिकाणे. रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी अशी दोन प्रमुख वैचारिक केंद्र म्हणजे नागपूर.यंदाच्या निवडणुकीत भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा नागपुरात लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर काँग्रेस म्हणजेच मविआने आमदार विकास ठाकरे यांना गडकरींच्या विरोधात तिकीट दिले आहे. त्यामुळे नागपुरातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील विकास ठाकरेंना नागपुरात पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अजूनच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
राजकीय घडामोडी
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे , संघाचे मुख्यालय यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तर २०१४ पूर्वी नागपूर हा काँग्रेसचा गडहोता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाख मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये नाना पटोले यांचा गडकरींनी पराभव केला होता. त्यानंतर नागपूर भाजपाकडे राहिले आहे नितीन गडकरींनी केंद्रात मंत्री म्हणून काम करताना देशातील रस्त्यांचे जाळे अत्यंत मोठ्या प्रमाणात विकसित केले आहे. त्यामुळे यंदा देखील नागपूरची जनता गडकरींना साथ देईल अशी जास्त शक्यता आहे. नागपूर लोकसभेत ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील ४ भाजपाकडे तर २ काँग्रेसकडे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस देखील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सलग ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
नागपूरच्या जनतेचे प्रश्न
राज्याचे उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचेच असल्यामुळे येथे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झालेला पाहायला मिळतोय. आयआयटी, आयआयएम, एम्स, कायदा विद्यापीठ, सिम्बॉयसीस, मिहान प्रकल्प, उड्डाणपुल, मेट्रो रेल, रस्त्यांचं जाळं अशी विकासाची गंगा नागपुरात आली आहे, मात्र अजूनही काही प्रश्न आहेत ते पूर्णपणे किंवा सुटलेच नाहीयेत. नागपुरात पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले तरी अनेक प्रकल्पांच्या कामात सुसूत्रता नसल्यानं नागपूरकर त्रासलेले आहेतसीमावर्ती भागात पाण्याची समस्या कायम आहे. नाग नदीनं दिलेला महापुराचा तडाखा अजूनही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. नाग नदी सौंदर्यीकरण कधी होणार, असा सवालही ते करतायत. बड्या कंपन्या, उद्योगसमूहांचा अजूनही अभाव आहे. त्यामुळं पाहिजे तेवढी रोजगारनिर्मिती झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे प्रश्न सोडविण्यासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना करणार व त्यासाठी ते जनतेसमोर काय मुद्दे मांडणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.
खरे तर तसे पाहिल्यास नागपूरची लढत एकप्रकारे सोपी आणि भाजपाच्या बाजूने दिसत आहेत. कारण एकीकडे देशातील हेवीवेट असलेले आणि विकासपुरुष म्हणून ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकसभेला उभे राहिले आहेत. नितीन गडकरींनी केलेला विकास आणि देशात निर्माण केलेलं रस्त्यांचे जाळे आणि केलेली अन्य विकासकामे पाहता गडकरींचे पारडे जाड दिसत आहे. तर काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना गडकरीविरुद्ध लोकसभेचे तिकीट दिले आहे. या माध्यमातून काँग्रेस गमावलेला गड परत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र नागपूर माझा मतदारसंघ आहे, मला संधी दिली असती तर निवडणूक लढविली देखील असती आणि जिकूनही दाखवली असे वक्तव्य माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. त्यामुळे नितीन राऊत हे उमेदवारी न दिल्याने नाराज आहेत अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे निवडणुकीत नक्की काय होते हे ४ जून रोजी आपल्याला कळणारच आहे. यज्ञाची निवडणूक ही विकासकामे तर सरकारी यंत्रणांचा विरोधकांवर सुरु असलेला गैरवापर, बेरोजगारी, महागाई अशा आणि अनेक अन्य मुद्द्यांवर होताना दिसणार आहे.