पश्चिम बंगाल मधल्या कूचबिहार येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अन्न सुरक्षा योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्राबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. मात्र हे घडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपले शब्द मागे घेतले. मी सुसंस्कृत भाषेतच बोलते असे म्हणत त्यांनी आपले भाषण आवरते घेतले व त्या निघून गेल्या.
मात्र, भाजपने त्यांच्या स्पष्टीकरणाला फारसे महत्त्व दिले नसून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पक्षाने आपल्या पत्रात लिहिले आहे की, मुख्यमंत्री असतानाही ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेत पंतप्रधानांचा अपमान केला आहे. हे सभ्य भाषेत आपले मत व्यक्त करण्याच्या नियमांच्या विरोधात आहे आणि निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. मात्र, यासंदर्भात आयोगाकडून सध्या कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी बंगालमध्ये होते. कूचबिहारमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. त्याच दिवशी ममतांनी कूचबिहारमध्ये जाहीर सभा घेऊन पंतप्रधानांसाठी अपशब्द वापरले आणि रेशनच्या पाकिटांवरही मोदींचे चित्र असल्याचे सांगितले. मी मरेन पण पंतप्रधानांचे रेशन खाणार नाही.असे त्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाल्याचे वृत्त समोर आले आहे.