महायुतीमधील लोकसभा निवडणुकीसाठीचा काही जागांचा तिढा अजून सुटताना दिसत नाहीये, धाराशीव लोकसभा मतदारसंघातून अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. आहे.महायुतीत धाराशीव लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. त्यामुळं अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे.
मात्र धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचा विरोध आहे.मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात याबाबत शिवसैनिक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. तसेच ते वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
धाराशीव लोकसभा मतदारसंघात मविआचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील असा सामना रंगणार आहे. अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.महायुतीच्या जागावाटपात धाराशीव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता. त्यामुळे अर्चना पाटील यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी गुरुवारी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.