मुंबई महापालिकेतील खिचडी घोटाळाप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. गेल्या 25 मार्च रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.
कोरोना रोगाच्या काळात मुंबईत स्वत:चे घर नसलेल्या गरीब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट मुंबई महापालिकेने 52 कंपन्यांना दिले होते. दरम्यान, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कठीण खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे. दरम्यान शिवसेनेने (उबाठा-गट) अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून निवडणुकीपूर्वीच त्यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे.
मुंबई महापालिकेत कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिलेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना याआधीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
आजच झालेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड हे संजय राऊत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला आहे . खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा काँग्रेसचे माजी खासदार निरुपम यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एक कोटी रुपयांची दलाली घेतली असल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक करावी, अशी निरुपम यांनी मागणी केली आहे.