सध्या आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी कोठडीत आहेत. मात्र आता आम आदमी पक्षाला भगदाड पडताना दिसत आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिला आहे. राजकुमार आनंद समाज कल्याण विभागाचे मंत्री होते. २०२३ मध्ये राजूकमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. मात्र त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाचा राजीनामा देताना माजी मंत्री राजकुमार आनंद म्हणाले, ‘मी दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहे आणि माझ्याकडे सात विभाग आहेत. पण आज मी खूप दुःखी आहे आणि माझे दु:ख सर्वांना सांगत आहे. मी राजकारणात आलो तेव्हा अरविंद केजरीवाल म्हणाले होते की राजकारण बदलले तर देश बदलेल. मात्र, आज मोठ्या खेदाने म्हणावे लागते की राजकारण बदलले नसून राजकारणी बदलले आहेत.
राजकुमार आनंद म्हणाले, ‘आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. मंत्रिपद भूषवताना या सरकारसाठी काम करणे माझ्यासाठी अशक्य झाले आहे. मी आता या पक्षाचा, या सरकारचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे कारण त्यांच्या भ्रष्टाचाराशी माझे नाव जोडले जाऊ नये असे मला वाटते.