महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. मुंबईतील जागावाटपात विश्वासात न घेतल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे, भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवार सुरेश म्हात्रे निवडणूक लढविणार असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.यासंदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.या भेटीत त्या उद्धव ठाकरेंसोबत उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहेत. उत्तर मुंबईतून लढण्यासाठी नाना पटोलेंनी थेट विनोद घोसाळकरांना ऑफर दिली होती.मात्र घोसाळकरांनी पंजावर म्हणजेच काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याच्या अटीला स्पष्ट नकार दिला असून घोसाळकरांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच लढणार असल्याचं स्पष्ट केले आहे तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाव्यात, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. यात प्रामुख्याने उत्तर-मध्य मुंबईसह दक्षिण-मध्य मुंबई काँग्रेसला मिळावी, अशी पक्षाची मागणी होती. मात्र, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्या जागेऐवजी मुंबई काँग्रेसला उत्तर मुंबईची जागा देण्यात आली आहे. ही जागा निश्चित करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना विचारात न घेतल्याने त्यांनी दिल्लीत पक्षनेतृत्वाकडे राज्यातील नेतृत्त्वाविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजत आहे.