देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी दोन सभा घेतल्या आहेत. दरम्यान आजच्या विशेष भागात आपण गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाबाबत जाणून घेणार आहोत.
नमस्कार. मी तेजस भागवत. ऋतं मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे, अन्य पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत का, तसेच येथील राजकीय समीकरणे आणि अन्य गोष्टी जाणून घेणार आहोत. गडचरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असा मतदारसंघ आहे. यंदाच्या निवडणुकीत हा मतदार संघ आपल्याकडे यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरेच प्रयत्न केले. मात्र विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी भाजपाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा अशोक नेते यांना संधी दिली आहे. तर काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे होम ग्राउंड असलेल्या या मतदारसंघात नामदेव किरसान यांना उमेदवारी मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने यंदा या ठिकाणी हितेश मडावी यांना तिकीट दिले आहे. मात्र मुख्य लढत ही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी होणार आहे. गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने लाखभर मते निवळी होती. त्यामुळे यंदाही तसे झाल्यास याचा फायदा कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर विजय वडेट्टीवार यांचे हा मतदारसंघ होमपीच ओळखला जातो. विजय वडेट्टीवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे फडणवीस आणि वडेट्टीवार यांच्यासाठी हा मतदारसंघातील निवडणूक महत्वाची आहे.
.
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय गणिताबद्दल बोलायचे झाल्यास यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कोणत्या उमेदवाराला तिकीट दिले आहे ते आपण मगाशी पहिलेच. २००८ मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता भाजपने इथे आपलीच सत्ता कायम राखली आहे. २००९ मध्ये काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेतेंचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये भाजपच्या अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडींना धूळ चारून विजय प्राप्त केला. २०१९ मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली. नेतेंनी दुसऱ्यांदा उसेंडींना पाणी पाजलं. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर या ठिकाणी भाजपचे ३, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा १ आमदार आहे. म्हणजेच या मतदारसंघात ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत.
मुळात गडचिरोली नाव ऐकले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो फोफावलेला नक्षलवाद. नक्षलवादामुळे येथे उद्योग येण्यास घाबरतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येथील परिस्थिती हळू हळू बदलत आहे. पोलाद, स्टील आणि अन्य प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी येत आहेत. मात्र सुरजागड लोह खनिज खाण, चुंबक खाणी, स्टील आणि स्पॉन्ज आयर्न उद्योग लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. आदिवासीबहुल भाग, वनसंवर्धन कायद्यामुळे सिंचनाच्या सोयी अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीयेत. वाघ, बिबट आणि रानटी हत्तींमुळं मानव आणि वन्यजीव संघर्ष हा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय. शासकीय मेडिकल कॉलेज अजून कागदावरच असल्यानं आरोग्य सुविधांची मोठी हेळसांड आपल्याला पाहायला मिळते.
डॉ. नामदेव किरसान यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास हे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रहिवासी आहेत. आधी ते नोकरी करायचे त्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ते सध्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाकारले होते. मात्र ते काम करतच राहिले. त्यांच्या या कष्टाचे चीज झाले असून, यंदा काँग्रेसने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे.
https://youtu.be/mp7z18FIIxU?si=rP0IRbfmL6Yhpi9Z
अशोक नेते यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते गडचिरोलीमध्ये लहानशी खानावळ चालवायचे. यामधूनच त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. पुढे ते भाजप युवा मोर्चासोबत जोडले गेले. भाजपच्या तालुकाअध्यक्षांपासून त्यांनी काम सुरू केलं. 1999 मध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. तेव्हा ते जिंकून आले. २००४ ला देखील त्यांचा विजय झाला. २००९ ला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत अशोक नेते हे खासदार म्हणून निवडून आले . तर पुन्हा एकदा दुसऱ्या मोदी लाटेत २०१९ ला देखील अशोक नेते देखील खासदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपा नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे.
खरेतर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ हा घनदाट जंगल, निर्बीड अरण्याचा प्रदेश आहे. येथे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या लोकसभा मतदारसंघात गडचिरोलीमधील ३ , चंद्रपूरमधील २ आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभेचा समावेश आहे. बेरोजगातिचे प्रश्न आहेत, नक्षलवादाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी देखील ते समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. गुंतवणूक होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास या भागाचा देखील इतर भागांप्रमाणे विकास होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही विकसित भारतासाठी आहे, देशाला प्रगतीपथावर अधिक पुढे नेण्याची आहे असं प्रचार भाजपा महायुती जनतेसमोर करत आहे. तर विरोधक बेरोजगारी, महागाई, ईडी, सीबीआय आणि देशात हुकूमशाही येत आहे असा मुद्द्यांवर प्रचार करताना दिसत आहे. मात्र मला असं वाटत की विरोधकांकडे या देशाला आम्ही ५ वर्षात काय काय देणार , त्याचा विकास कशाप्रकारे करणार मग ते संरक्षण, कृषी, आरोग्य, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांमधील असेल यावर बोलायला काही आहे असं वाटत नाहीये. त्यामुळे यंदाची निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी होणार आहे. या लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होते हे आपल्याला ४ जून रोजी कळणारच आहे.