” लेक लक्ष्मी तर सून महालक्ष्मी…ज्या शरद पवारांनी महिला धोरण आणले त्यांच्याकडून समस्त सूनांचा अपमान करणारं विधान समोर आले आहे . शरद पवार विसंगत भूमिका घेताना दिसले आहेत. लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झालेत हे खेदानं म्हणायची वेळ आली आहे. सुप्रिया सुळेंना मतदान करा असे आवाहन करा, पण जी सून तुमच्या घरात आली, कुटुंबात आली. तुमचे कूळ वाढवलं तिला मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा तिला दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर काढण्याचे शरद पवारांचं विधान होते” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, शरद पवारांच्या विधानामुळे माताही दुखावल्या आहेत. शरद पवारांनी केलेले विधान दु:खद आहे. बारामतीची जनता हे पाहत आहे. बारामतीची निवडणूक भावनिक करण्यापेक्षा याठिकाणी १५ वर्ष तुम्ही खासदार आहोत. त्या भागात काय काय विकास केला हे सांगावे. आम्ही अजितदादांनी काय काय विकास केला हे सांगतोय. सुनेत्रा पवार या स्वत:साठी मते मागत आहेत. परंतु ही निवडणूक भावनिक करून राजकारणाचा दर्जा खालवला जातोय याचेही भान ठेवले गेले पाहिजे असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते.यावरून शरद पवार यांच्यावर मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सरळसरळ भेदभाव केल्याबद्दल टीकेची झोड सर्व बाजुंनी उठवण्यात येत आहे.