दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी ईडीच्या अटकेविरुद्ध हायकोर्टात त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मात्र सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना तातडीने दिलासा देण्यास नका दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना सध्या कोठडीतच राहावे लागणार आहे.
केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर ईडीला नोटीस बजावली ज्याने या प्रकरणात त्यांची अटक कायम ठेवली होती. खंडपीठाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.