लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. देशात १०२ तर राज्यात पाच जागांवर मतदान होत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. आज सायंकाळनंतर इथल्या उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचार रॅली, सभा आणि मिरवणुकीने गाजणार आहे.
राज्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.
पहिल्या टप्प्यात होत काही मतदार संघात लक्षवेधी लढती होत आहेत. त्यात नागपूर लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचे तगडे आव्हान बघायला मिळणार आहे. तर चंद्रपूर लोकसभेत मंत्री सुधीर मुनगंटीवांरांना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान असेल. या दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर होताना पाहायला मिळत आहे. शिवाय रामटेक, गडचिरोली आणि भंडारा गोंदीयात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र या ठिकाणी बसपा आणि वंचितचेही उमेदवार यावेळी मैदानात असल्यानेत्याचा मतविभाजनात काय फरक पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुर्व विदर्भात प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्या शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार प्रचार केलेला दिसून आला होता. . तर महाविकास आघाडीकडून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, उबाठा नेते संजय राऊत हे विदर्भात प्रचारासाठी पोचले होते.