देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे.
यंदा भाजपाने म्हणजेच महायुतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीने डॉ. प्रशांत पडोळे यांनी तिकीट दिले आहे. मात्र महायुती आणि माविआ यांच्यातील नेत्यांनी आपल्या अधिकृत उमेद्वारांविरुद्ध बंडखोरी केली. भाजपचे संजय कुंभलकर हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे दोघे अपक्ष मैदानात उतरले आहेत. या बंडखोरीचा अधिकृत उमेदवारांना तोटा होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने संजय केवट या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. मात्र बंडखोरी केलेल्या नेत्यांचे बंड गेल्या काही दिवसांत शमलेले दिसत आहेत.
२०१९ मध्ये सुनील मेंढे यांनी पावणे दोन ते दोन लाख मतांनी विजय प्राप्त केला. यंदा तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष देखील आहेत. गोंदिया-भंडारा हा मतदारसंघ प्रफुल पटेल यांचा गड समजला जातो. त्यामुळे सुनील मेंढे यांना इथे मोठी मदत मिळणार आहे. या मतदारसंघात भाजपचे संघटन अत्यंत मजबूत आहे. मात्र गेल्या १० वर्षांत त्यांनी फारशी विकासकामे केले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र तीन पक्ष एकत्रित असल्याने त्यांचा विजय होण्याची शक्यताही तितकीच आहे.
महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेस आपले नशीब अजमवणार आहे. त्यामुळे काँग्रेसची पारंपरिक मते त्यांना मिळू शकतात. मात्र येथून उमेदवारीसाठी अनेकजण इकचुक होते. ज्येष्ठ व इच्छुकांना डावलून नवख्या पडोळे यांना संधी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी आमदार आमदार सेवक वाघाये यांनी पाडोळेंच्या उमेदवारीला आव्हान दिले असून, यावेळी त्यांनी नाना पटोले आणि पक्षावर अनेक आरोप केले आहेत. पक्षांतर्गत धुसफूस पडोळे यांच्या विजयला अडचण ठरण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच दोन्ही उमेदवारांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो. बसपचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवट हे कोणाची मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होतो हे पाहणे महत्वाचे असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभांमधून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करत आहे. प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीचे रेकॉर्ड मोडले जातील इतके मतदान करावे, सकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत. तसेच प्रत्येकाने लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असे नम्र आवाहन ऋतं परिवारातर्फे तुम्हाला करण्यात येत आहे.