लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजे १९ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आणि देशातील जनतेचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. अजित पवार हे शरद पवारांपासून लांब आले. महायुतीत सामील झाले. त्यानंतर महायुतीने सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून तिकीट दिले आहे. आज सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा सूनबाई दिल्लीत जाणार म्हणजे जाणारच असे भाष्य केले.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”माझी नजर जाईल तिथपर्यंत मला लोकचं लोकं दिसत आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच केलेला आहे. व्यासपीठावर एवढे मोठे नेते आहेत, त्यावरून दिसून येत आहे की, बारामतीला आता कोणीही थांबवू शकत नाही. मला विश्वास आहे की आपल्या आशीर्वादाने बारामतीत एक नवीन इतिहास घडेल आणि सूनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातीलच. अजितदादांनी गेल्या २५ ते ३० वर्षांत बारामतीमध्ये मेहनत केली, विकास केली , माणसे जोडली. ही लढाई पवार विरुद्ध दादा, सुनेत्रा ताई विरुद्ध सुप्रिया ताई अशी नाहीये. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात काम करतोय. ”
आज महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले खासदार मेधा कुलकर्णी आणि महायुतीचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मोठे शक्तीप्रदर्शन करत सुनेत्रा पवारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.