लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील १०२ जागांवर आज मतदान होत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील ५ जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला ४ जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे.सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे.
आज ७ वाजता मतदानाला सुरवात झाली असून सर्व पक्षांचे उमेदवार मतदानकेंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.
भंडारा-गोंदियामधून मविआचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. तसेच सर्वांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून असे आवाहन पडोळे यांनी नागरिकांना केले आहे.
नागपूरमध्ये लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे..
चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरच्या वरोरा शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत बघायला मिळणार आहे.
आमदार राजू पारवे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून उमरेडच्या परसोडी येथील पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी मतदान केले आहे. .राजू पारवे हे महायुतीकडून निवडणुकीला उभे आहेत.