सोलापूर 21 एप्रिल : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलण्यात आल्याने मोहिते पाटील कुटुंबाने वेगळी वाट पकडत भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्याची उमेदवारीही जाहीर केली आहे.
मोहिते पाटलांच्या पक्षांतरामुळे माढ्यासह सोलापूरचंही राजकीय गणित बदलण्याची चर्चा सुरू आहे. अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांनी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटकपक्ष असल्याने राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम सातपुते यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, सोलापुरातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी मोहोळच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या राजन पाटलांची भेट घेतल्याचे समजते.